Ahmednagar : अंगणवाडी सेविका, मदतनीस आज पासून संपावर

अहमदनगर :  मानधन नको, वेतन हवे, या मागणीबाबत अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा लढा सुरू आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने (दि.4 डिसेंबर)आज पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर जाणार आहेत. तसे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले. तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी बुधवारी बालविकास प्रकल्प कार्यालयाच्यासमोर ठिय्या मांडला. या वेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेवासा तालुकाध्यक्ष मन्नाबी शेख यांनी जोपर्यंत मागण्यांची सरकार दखल घेत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे सांगत मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवून हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या, सन्मानजनक वेतनवाढ, दरमहा पेन्शन यासह विविध मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू होती. राज्य शासन व प्रशासनाशी वारंवार चर्चा करण्यात आली. परंतु मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने (4 डिसेंबर) पासून राज्यभर बेमुदत संप जाहीर केला आहे. चालू महिन्यातील कुठलीही माहिती, अहवाल देणे, तसेच मासिक बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कृती समितीचे घेतला आहे.

जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष कॉ. मदिना शेख, सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, सहचिटणीस कॉ. जीवन सुरूडे यांच्या निवेदनावर सह्या आहेत. नेवासा येथे झालेल्या सभेस जिल्हाध्यक्ष माया जाजू, अलका दरंदले, अनिता बर्डे, मंदा निकम, सुशीला गायकवाड, प्रतिभा निमसे, ताराबाई मुरदरे, बेबीताई आदमने, चंद्रकला पिटेकर, सुवर्णा आरले, रेणुका चौधरी, सुरेखा शेटे, वर्षा परदेशी, विमल वांढेकर, नंदा राजगुरू, सुनीता घालमेले यांनी मनोगत व्यक्त केले. बालविकास कार्यालयाच्या जयश्री जाधव यांना वडाळा व नेवासा प्रकल्पाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी निवेदन दिले.