Charlie Munger : वॉरेन बफे यांचे विश्वासू सल्लागार चार्ली मुंगेर यांचे निधन

जगातील प्रसिद्ध गुंतवणूक फर्म बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष यांचे मंगळवार (दि.२८) रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  चार्ली मुंगेर यांना बर्कशायर हॅथवेचे संस्थापक वॉरेन बफे यांचा उजवा हात असल्याचे म्हंटले जात होते. बर्कशायर हॅथवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे चार्ली मुंगेरच्या मृत्यूची माहिती दिली आहे. येत्या १ जानेवारीला ते आपला १०० वा वाढदिवस साजरा करणार होते. (Charlie Munger)

Charlie Munger : चार्ली मंगर बद्दल हे माहित आहे का?

चार्ली मुंगेर यांचा जन्म १९२४ मध्ये झाला.  हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली, त्यानंतर त्यांनी आर्थिक क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांनी मुंगेर, टोलेस अँड ओल्सन ही आर्थिक कायदा संस्था स्थापन केली. दरम्यान १९६२ मध्ये वॉरन बफे यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी व्यावसायिक भागीदारी केली. निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, चार्ली मुंगेरची २०२३ मध्ये एकूण संपत्ती सुमारे $२.३ अब्जच्या दरम्यान आहे. बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, ते एक प्रसिद्ध रिअल इस्टेट वकील, कॉस्टको बोर्ड सदस्य, डेली जर्नल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. दिग्गज गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफे यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

 वॉरन बफेच्या यशात चार्ली मुंगेर यांचा मोठा वाटा

चार्ली मुंगेर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना वॉरन बफे म्हणाले की, “बर्कशायर हॅथवेच्या यशात चार्ली मुंगेर यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. वॉरन बफे यांनी बर्कशायर हॅथवेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की चार्ली मुंगेर यांच्या सहभागाशिवाय आणि सल्ल्याशिवाय बर्कशायर हॅथवे या पदावर पोहोचू शकलो नसतो.  कंपनीला मोठे करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली जी कायम स्मरणात राहील.