संसद भवनात पुन्हा करोनाचा स्फोट; आधी ४०२ कर्मचारी बाधित आणि आता…

हायलाइट्स:

  • संसद भवनात करोनाची दहशत वाढली.
  • आणखी ११९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण.
  • चार दिवसांपूर्वी आढळले होते ४०२ बाधित.

नवी दिल्ली: ओमिक्रॉनच्या एंट्रीनंतरराजधानी दिल्लीत करोनाचा कहर सुरू असून याचा फटका संसद भवनालाही बसला आहे. संसद भवनात काम करत असलेल्या आणखी ११९ कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना करोना संसर्गाने गाठले आहे. या कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आज देण्यात आली.

संसद भवनात गेल्या काही दिवसांपासून करोनाची दहशत पसरली आहे. सहा आणि सात जानेवारी रोजी संसद भवनात काम करणारे कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांची कोविड चाचणी करण्यात आली असता त्यात ४०२ कर्मचारी बाधित आढळले होते. त्यानंतर व्यापक प्रमाणात कोविड चाचण्या करण्यात येत असून आज संसद भवनातील आणखी ११९ कर्मचारी करोना बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. यात प्रामुख्याने लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेश जवळ आले असताना संसद भवनात करोनाचा स्फोट झाल्याने स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा वेगवान पावले उचलत आहे.दरम्यान, दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असताना राजकीय नेत्यांनाही विळखा पडू लागला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करोना झाला होता. ते आता बरे झाले आहेत. त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा करोना चाचणी अहवाल कालच पॉझिटिव्ह आला आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही करोनाने गाठले आहे.

दिल्लीत रुग्णसंख्येचा उद्रेक

करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर दिल्लीत रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. कोविड पॉझिटिव्हिटी रेटही अचानक वाढला आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत २१ हजार २५९ नवीन बाधितांची नोंद झाली तर २३ करोना बाधित रुग्णांचा मृत्या झाला. त्यामुळे दिल्ली सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. दिल्लीतील खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून रेस्टॉरंट्स आणि बारही बंद करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *