Uttar Pradesh Election: अखिलेश कोणता नवा धमाका करणार?; भाजप अस्वस्थ, ‘डॅमेज कंट्रोल’साठी थेट…

 

हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेशात भाजपला सपाचा तगडा झटका.
  • भाजपचे आणखी दोन मंत्री सपाच्या वाटेवर.
  • डॅमेज कंट्रोलसाठी अमित शहा उतरले मैदानात.

लखनऊ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध बंड करत कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज राजीनाम्याचा बॉम्ब टाकला. मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत अन्य तीन आमदारांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. त्यापाठोपाठ आणखी दोन मंत्री आणि अर्धा डझन आमदार येत्या एकदोन दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी देतील असे सांगितले जात असून ‘डॅमेज कंट्रोल’साठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सूत्रे हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपच्या धुरिणांना जराही मागमूस लागू न देता आज कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मोठा बॉम्ब फोडला. स्वामी प्रसाद यांनी मंत्रिपद आणि भाजपला रामराम ठोकून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाच पण त्यासोबत भाजपला खिंडार पाडण्याचा इशाराही दिला आहे. मुख्य म्हणजे आजच भाजपचे तीन आमदार राजीनामा देऊन स्वामी प्रसाद यांच्यासोबत सपात सामील झाले आहेत. त्यानंतर येत्या एकदोन दिवसांत भाजपला आणखी मोठे धक्के दिले जातील, असे स्पष्ट संकेत स्वामी प्रसाद यांनी दिले आहे. उत्तर प्रदेशातील या घडामोडींवर ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात बदलाचे वारे वाहत आहेत. जनतेचा भाजपवरचा विश्वास उडाला आहे. आज एक मंत्री भाजपला सोडून गेला. एकूण १३ आमदार भाजपला रामराम ठोकून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत, असे पवार म्हणाले.

अमित शहा झाले सक्रिय

उत्तर प्रदेशातील राजकीय भूकंपाचे हादरे दिल्लीपर्यंत बसले आहेत. मौर्य यांच्यासोबत भाजपचे सहा आमदार सपात जातील अशी शक्यता उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात आली आहे. यात एक किंवा दोन मंत्रीही भाजपला धक्का देण्याची शक्यता आहे. त्यामुळेच डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द केंद्रीय मंत्री अमित शहा हे दिल्लीतून सूत्रे हलवत असल्याचे सांगण्यात आले. भाजप सोडण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांचे मन वळवण्याची जबाबदारी शहा यांनी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, सुनील बंसल आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे दिली असून ते सतत त्यांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जात आहे.

भाजपला बसणार आणखी धक्के

स्वामीप्रसाद मौर्य यांच्यापाठोपाठ आजच भाजपला आणखी तीन धक्के बसले. मोर्य यांचे समर्थक मानले जाणारे बांदा येथील तिंदवारी मतदारसंघाचे आमदार ब्रजेश प्रजापती, शाहजहानपूरमधील तिलहरचे आमदार रोशनलाल वर्मा आणि कानपूरमधील बिल्हौरचे आमदार भगवती सागर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. हे तिन्ही आमदार समाजवादी पक्षात सामील झाले आहेत. त्यांची उमेदवारीही पक्की मानली जात आहे. त्यानंतर मंत्री धर्म सिंह सैनी आणि दारा सिंह चौहान हे भाजपला रामराम ठोकतील अशी चर्चा असून तसे झाल्यास भाजपला मोठा झटका बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *