PM मोदींच्या सुरक्षेत चूक; पंजाब सरकारला झटका, सुप्रीम कोर्टाने नेमली…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत झालेल्या चूक प्रकरणी ( pm security breach ) सुप्रीम कोर्टाच्या ( supreme court) निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील एक समिती चौकशी करणार आहे. सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) डीजी आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) च्या पंजाब युनिटचे अतिरिक्त डीजी यांचाही समावेश असेल, असे कोर्ट म्हणाले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राच्या वतीने युक्तिवाद केला. पंजाबचे डीजी आणि मुख्य सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले. मात्र, सुप्रीम कोर्टाने तपास थांबविण्याचे निर्देश दिल्याने या प्रकरणात पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील उल्लंघन प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली होती. पण कोर्टाच्या निर्देशानुसार आपले काम थांबवले आहे, असे मेहता यांनी सांगितले.

केंद्र आणि पंजाब सरकारने या प्रकरणी वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी या समित्यांच्या पुढील तपासाला सोमवारपर्यंत म्हणजे आजपर्यंत तपास रोखण्याचे निर्देश दिले होते. आता सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र समिती नेमल्याने दोन्ही केंद्र आणि पंजाब सरकारला आपल्या समित्यांद्वारे होणारी चौकशी रोखण्याची निर्देश दिले आहेत.

जो युक्तिवाद करण्यात आला आहे आणि हे प्रकरण पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने सर्व रेकॉर्ड आपल्या ताब्यात घेणे योग्य ठरेल. पंजाब सरकार आणि केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे आणि सर्व रेकॉर्ड ताबडतोब रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे सुपूर्द करावे, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले होते. कोर्टाने सोमवारी म्हणजे आज पुढील सुनावणी ठेवली होती.

याचिकाकर्ते मनिंदर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला आणि असे पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंती केली. मनिंदर सिंग हे स्वत: सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. या घटनेची तात्काळ न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

काय आहे प्रकरण?

पंजाबमधील फिरोजपूर येथील हुसैनीवाला येथील शहीद स्मारक उद्यानात जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा फ्लायओव्हरवर रोखण्यात होता. खराब हवामानामुळे पंतप्रधानांना भटिंडा विमानतळावर उतरून रस्त्याने हुसैनीवाला येथे जावे लागले. तिथे भाजपची निवडणूक सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या एका गटाने कार्यक्रमस्थळाच्या ३० किमी आधी उड्डाणपुलावर त्यांना रोखले. यामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून होता. तिथून पाकिस्तानची सीमा केवळ १२ किमी अंतरावर असल्याने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हा मोठा निष्काळजीपणा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *