‘कोरोनाची अधिकाऱ्यांसोबत बैठक, धमकी म्हणून ठाकरेंकडून नाईट कर्फ्यू जारी’, जलील यांनी उडवली खिल्ली

औरंगाबाद : राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, राज्य सरकारने शनिवारी काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयांची खिल्ली उडवत एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी खोचक टीका केली आहे. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले त्या दिवशी महाराष्ट्र पुन्हा सर्व काही बंद करण्याच्या जवळ आला आहे, यापेक्षा मूर्खपणाची गोष्ट काय असू शकते,असा टोला जलील यांनी लगावला आहे.

“कोरोनाची नुकतीच सर्व उच्च नोकर शहांसोबत सविस्तर बैठक झाली आणि या विषाणूने सरकारला स्पष्टपणे सांगितले की, तो रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत खूप सक्रिय असतो. त्यामुळे या धमकीला उत्तर देताना सरकारने तात्काळ महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला”, असे ट्विट करत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयाची खिल्ली उडवली.

विशेष म्हणजे गेल्यावेळी सुद्धा नाईट कर्फ्यूला जलील यांनी विरोध केला होता. तसेच दोन दिवसांपुर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर काय निर्बंध घालायचे ते घाला, पण लॉकडाऊन सहन करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यामुळे शनिवारी घोषणा करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूवरुन जलील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. महाराष्ट्राचा कोरोना रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार गेलाय तर एकट्या मुंबईने २० हजारांचा आकडा क्रॉस केलाय. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर सकाळी ५ ते रात्री ११ जमावबंदी लागू असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *