महिलेची आत्महत्या: रात्री नवऱ्याशी भांडण, दोन चिमुकल्यांसह रागाच्या भरात महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ असलेल्या मालडोंगरी येथील महिलेने घरगुती वादातून स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपा रवींद्र पारधी ( 33) असे मृत महिलेचे नाव असून आयुष आणि पियुष (3) अशी मृत बालकांची नावे आहेत.

मालडोंगरी येथील रवींद्र मुरलीधर पारधी व त्यांची पत्नी दीपा रवींद्र पारधी, आपल्या दोन मुलांसह राहत होते. घटनेच्या आधीच्या रात्री पती रवींद्र व पत्नी दीपा यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरून निघून गेली.

पती रवींद्र याने नातेवाईक- शेजार्‍यांसह शोधाशोध केली असता सकाळी मालडोंगरीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपा, आयुष व पियुष ह्या तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

दरम्यान, नेहमीच होणारे पती-पत्नीतील वाद या घटनेमागील कारण असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *