‘जेजे’मध्ये औषध तुटवडा कायमच;३३ औषधांची गरज, पॅरासिटॅमॉलही गायब

मुंबई

जे. जे. रुग्णालयात औषधांचा व वैद्यकीय सामग्रीचा तुडवडा अजूनही कायम आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला अंगदुखी ही लक्षणे जाणवत असली तरीही त्यांच्यासाठी पॅरासिटॅमॉलसारख्या साध्या गोळ्याही उपलब्ध नाहीत. हाफकीन बायोफार्माकडे पाठपुरावा करूनही त्या उपलब्ध झालेल्या नाहीत. ‘मटा’कडे उपलब्ध असलेल्या यादीनुसार ३३ औषधांची तातडीने गरज आहे.

हाफकीन बायोफार्माकडून राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयांना औषधे पुरवली जातात. सन २०२०-२१मध्ये नोंदणी केलेल्या केवळ ३० टक्केच औषधे प्राप्त झाली. एकाच वेळी औषधे आल्यास मुदत संपण्याचा कालावधीही नजीकचा असतो. त्यामुळे ती विनावापरही वाया गेल्याचे यापूर्वी ‘मटा’ने निदर्शनास आणून दिले होते.

एन्ट्रानिल सायट्रेट हे वेदनाशमक इंजेक्शन, अॅमोक्सिन क्लॅव्ह इंजेक्शन, सर्पदंशासाठी देण्यात येणाऱ्या अॅण्टी स्नेक व्हेनम, एचआयव्हीचा संसर्ग बाधित आईकडून बाळाला होऊ नये यासाठी देण्यात येणारे हेपॅटायसिस बी इम्युनोग्लोबिन, पॅरासिटेमॉल, स्टराइल वॉटर, करोना रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारी काही औषधे सध्या उपलब्ध नाहीत.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. तर हाफकीन बायोफार्माचे संचालक डॉ. संदीप राठोड यांनी सांगितले, ‘७० टक्के औषधांची उपलब्धता करण्यात आली असून, उर्वरित औषधांची उपलब्धता करण्याचे पूर्ण प्रयत्न होत आहेत. तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्या माध्यमातून राज्यातील रुग्णालयामध्ये किती औषधांची गरज आहे हे लक्षात येईल व पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होईल.’

पूर्वीची पद्धत उपयुक्त

रेट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये दर तीन महिन्यांनी रुग्णालयाला किती औषधांची गरज लागणार आहे याची यादी दिली जात होती. त्यामुळे पुरवठा व मागणीचे गणित सुरळीत होते. मागील दोन वर्षापासून ही व्यवस्था सुरळीत होऊ शकलेली नाही.संबधित विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्याकडे हा प्रश्न नेण्याचा सातत्याने प्रयत्न करूनही त्यात य़श आलेले नाही. केवळ मुंबईचीच नव्हे तर राज्याच्या आरोग्यव्यवस्थेमधील महत्त्वाचे रुग्णालय असलेल्या जेजे रुग्णालयामधील औषधांच्या उपलब्धतेची ही समस्या केव्हा सुटणार असा प्रश्न येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यासह रुग्णांनीही उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *