राज्यात तुर्तास Lockdown नाही पण ‘हे’ सहा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता

हायलाइट्स:

  • लॉकडाऊनऐवजी करोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत
  • बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल
  • आज संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.

मुंबई: राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी तुर्तास राज्यात लॉकडाऊन लागू करायचा नाही. त्याऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्सचे तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल तासभर चर्चा सुरु होती. या चर्चेअंती तुर्तास राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे. मात्र, लॉकडाऊनऐवजी करोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.
निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन न करण्यावर ठाम असल्याचे समजते.

राज्यात कोणते नवे निर्बंध लागू शकतात?

* राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद पाळला जाईल.

* विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या आणि धार्मिकस्थळे पूर्णपणे बंद राहतील.

* विकेंड लॉकडाऊनच्या काळात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी

* सोमवार ते शुक्रवारी रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू राहील.

* शाळा, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळांच्या परिसरात जमावबंदी

* गर्दी केल्यास कलम १४४ अंतर्गत कारवाई होणार

भारतात करोनाची तिसरी लाट

देशात करोना व्हायरसची तिसरी लाट आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. देशात काल दिवसभरात ५८ हजारांहून अधिक नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ५३४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी मंगळवारी देशात ३७, ३७९ रुग्ण आढळले होते. करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ५० हजारांवर आढळून येत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही २,१४,००४ वर पोहोचली आहे. देशातील रोजचा पॉझिटिव्हिटी दर हा ४.१८ टक्क्यांवर वाढला आहे. करोनाने देशात आतापर्यंत ४ लाख ८२ हजार ५५१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *