पुणे जिल्हा बँकेची निवडणूक जिंकल्यानंतरही अजित पवारांना एका गोष्टीची खंत

 

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीच्या सात जागांचा निकाल आज लागला. यापैकी सहा जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं. मात्र, एका जागेवर झालेल्या पराभवाचीच चर्चा सध्या जास्त आहे. हा पराभव अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक मानला जात असून खुद्द अजित पवारांनी तशी कबुली दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी एका जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना आव्हान दिलं होतं. अजित पवार यांनी हे आव्हान गंभीरपणे घेतलं होतं. कंद यांना जागा दाखवून द्या असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना केलं होतं. मात्र, त्यानंतरही कंद हे निवडून आले. अजित पवार यांनी उघडपणे ही खंत व्यक्त केली. एका जागेचं वाईट वाटतंय, असं निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं.

‘मला त्या एका जागेवर शंका होतीच. नक्की कुठे कमी राहिली हे आम्ही शोधून काढू. सात पैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला, एक तेवढी जागा गेली. यात काय गडबड झाली याची बारकाईनं माहिती घेतली जाईल. तरी सुद्धा आम्हाला बारामतीत चांगला लीड मिळाला आहे. एका ठिकाणी पराभव झाला असला तरी इतर तालुक्यात राष्ट्रवादीच्या महिला भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. दौंड, पुरंदर, आंबेगाव या ठिकणी सुद्धा राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *