शिवसेना गोव्यात भाजपला ‘बीच’ दाखवणार! संजय राऊत म्हणाले…

पणजी : आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये गोव्याचीही निवडणूक होणार आहे. यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विशेष करून गोव्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. आता गोवा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाही उतरत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे मोर्चेबांधणी करण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा ‘यशस्वी’ फॉर्म्युल्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत हे गोव्यात चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी गोव्यात दाखल झाले. गोवा निवडणुकीत आघाडीच्या स्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांशी आज ते चर्चा करणार आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना काही जागा नक्कीच लढवेल आणि आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेस नेते, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उद्या चर्चा करून नवी आघाडी करण्याचा प्रयत्न करू, संजय राऊत यांनी गोव्यातील दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेच्या महाविकास आघाडीचा एक यशस्वी फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला आम्ही गोव्यात वापरणार आहोत. प्रदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी काँग्रेस गोव्यात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली. कामत यांच्यासोबत संजय राऊत यांची जागावटपाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी काँग्रेसकडे ७ जगांची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे. पण याबाबत अधिकृत माहिती कुठल्याही पक्षाकडून देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *