तुम्ही मला जमिनीचा वाटा देत नाही, असं म्हणत मध्यरात्री मुलाचा आई-वडिलांवर हल्ला, आईचा मृत्यू, वडील थोडक्यात वाचले!

हायलाइट्स:

  • इंदापूर तालुक्यातील काझड गावात भयंकर घटना
  • पैशांसाठी मुलाचा आईवडिलांवर जीवघेणा हल्ला
  • गंभीर जखमी आईचा जागीच मृत्यू, वडील थोडक्यात वाचले

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील काझड गावात मुलाने आई-वडिलांवर धारदार कोयत्याने वार करून आईचा खून केला असून वडिलांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (दि. २ जानेवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत वडील पांडुरंग बाबुराव नरुटे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. अमित पांडुरंग नरुटे याने रविवारी रात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान आई-वडिलांसोबत वाद घातला. ‘तुम्ही मला मागेल तेवढे पैसे देत नाही. तुम्ही माझे आई-वडील नाहीत. मला जमीन वाटून देत नाही, असं म्हणत वडील पांडुरंग नरुटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पांडुरंग नरुटे यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला तर दुसऱ्या हाताचा अंगठा व डाव्या हाताच्या दंडावर गंभीर जखम झाली. अमितनं आई अलका पांडुरंग नरुटे (वय ५५) हिच्या तोंडावर, कपाळावर, डाव्या डोळ्यावर, नाकावर कोयत्याचे वार केले. या हल्ल्यात अलका नरुटे गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी अमित पांडुरंग नरुटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *