संगमनेर : घारगावला दिंडीत कंटेनर घुसला, ३ वारकरी ठार तर ९ जखमी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने शिर्डी येथून साई नामाचा गजर करत आळंदीकडे दिंडी निघालेली होती. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास नांदूर खंदरमाळ फाट्याजवळील १९ मैलावर या दिंडीत भरधाव वेगात आलेला कंटेनर (क्र. MH 12 VT 1455) घुसला. चालकाला झोप लागल्याने कंटेनर महामार्गाने चाललेल्या दिंडीत घुसल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊजण जखमी झाले.

या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटली नसून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारकऱ्यांना चिरडणाऱ्या कंटेनरची परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. कार्तिकी एकादशीला आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.