महिलेचा विनयभंग करणारा आरोपी जेरबंद

अहमदनगर : घरात घुसून महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपी तरुणाला कोतवाली पोलिसांनी काही तासांतच अटक केली असून सदर आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. शुक्रवारी दि.२८ पहाटे पाच वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.


कैलास नाना लोंढे (वय २५, रा.संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) असे कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित महिला घरात होती. सासू या बाहेर गेल्या होत्या. फिर्यादी घरात झोपी गेलेल्या असताना कैलास नाना लोंढे हा घुसला व घरातील लाईट बंद केली. पीडित महिलेशी गैरवर्तन करताच महिलेने आरडोओरड केली. दरम्यान महिलेची सासू आवाज ऐकून आली त्यावेळी आरोपी कैलास नाना लोंढे फिर्यादीस जोरात भिंतीवर ढकलून पळून गेला. पीडित महिलेने आरोपी विरोधात दिलेल्या फियादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश पथकाला दिले होते. कोतवाली पोलिसांनी आरोपीचा काही तासांतच शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव गणेश धोत्रे, योगेश भिंगरदिवे, अमोल गाडे, सोमा राऊत, देवा थोरात यांनी ही कारवाई पार पाडली.

तक्रार देण्यासाठी महिला-मुलींनी समोर या! नाव गोपनीय ठेवण्यात येईल..


रोडरोमिओ व टवाळखोरांनी महिला तसेच मुलींकडे वाईट नजरेने पाहिल्यास अथवा गैरवर्तन केल्यास संबंधित महिला किंवा मुलीने कोतवाली पोलिसांशी संपर्क करावा. संबंधित तरुणीचे/महिलेचे नाव पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येईल. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून, अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित महिलेने तसेच मुलीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.