पंचावन्न वर्षांवरील पोलीस वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर नसावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

रस्तेवाहतून नियोजनासाठी वय वर्षे 55 पूर्ण असलेला एकही पोलीस रस्त्यांवर नसावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निर्देशात म्हटले की, वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यातत यावे. खास करुन रस्त्यांवर आणि चौकांमध्ये भर, उन्हा पावसात कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांना पुरेशी सावली आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी.

टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री शिंदे हे एकदा ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. या वेळी त्यांना रस्त्यावर काही पोलीस कर्तव्य निभावताना दिसले. त्यापैकी काही पोलीस वयाने बरेच अधिक असल्याचे जाणवत होते. वाढत्या वयाचे असूनही हे पोलीस रस्त्यावर उन्हात उभा राहून कर्तव्य निभावत होते. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आयुक्तांना बोलावले आणि लगेचच वय वर्षे 55 पेक्षा अधिक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कडक उन्हात कर्तव्यासाठी तैनात करु नयेतत असे निर्देश दिले. 

पोलिसांच्या आरोग्य, सुरक्षा आणि इतर सेवा-सुविधांसाठी गरज पडल्यास मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही शिंदे म्हणाले. वाहतूक पोलिसांना ऊन, वारा, पाऊस यांसोबतच त्यांना प्रदुषणाचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. खास करुन, वाहनांचा धूर, रस्त्यावरची धूळ आणि गोंगाट यांमुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अशा वेळी राज्य सरकार त्या दृष्टीने काय करणार? याबाबत उत्सुकता आहे.