नगर : शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने बदली प्रक्रियेतील विशेषतः संवर्ग दोनमध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाजेदा अमीर शेख ह्या देवळाली प्रवरा येथील उर्दू शाळेत उपाध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2022 ऑनलाईन प्रणालीव्दारे पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत संवर्ग दोनमध्ये ऑनलाईन अर्ज भरला होता. मात्र हा अर्ज भरताना पती कलीम मेहबुब शेख उपाध्यापक नेवासा उर्दू शाळा यांचे कार्यरत शाळेपासून 30 कि.मी पेक्षा जास्त अंतरावरील जि.प.उर्दू शाळा दर्गादायरा ता. नगर येथे बदलीकरीता ऑनलाईन अर्ज करून बदलीचा लाभ घेतला.
त्यामुळे शिक्षण विभागाकडे या संदर्भात प्राप्त झाली होती. वाजेदा शेख यांनी संवर्ग दोनमध्ये शाळा निवडताना पतीच्या शाळेपासून 30 कि.मी. अंतरावरील शाळा न निवडता जास्त अंतरावरील शाळेची निवड करून बदलीचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर येरेकर यांनी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांचे मुख्यालय नेवासा राहणार आहे.