जालियनवाला हत्याकांडांचा बदला घेण्यासाठी उधमसिंग यांनी 21 वर्षं वाट पाहिली होती..

हरजश्वेर पाल सिंह

udham singh

13 एप्रिल 1919 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे मोठी सभा सुरू होती. जालियनवाला बागमध्ये 15 ते 20 हजार माणसं जमली होती.

मार्च महिन्यात ब्रिटिश सरकारने मंजूर केलेल्या रॉलेट कायद्याचा निषेध करणाऱ्या सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक करण्यात आली. तर आंदोलकांवर गोळ्याही चालवण्यात आल्या होत्या. यावेळी इंग्रजांच्या छोट्या तुकडीचं नेतृत्व जनरल डायरने केली होतं. पण या हत्याकांडाचा आदेश तत्कालीन पंजाब गव्हर्नर मायकल ओडरवायर यांनी दिला होता.

या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य सैनिक उधमसिंग यांनी तब्बल 21 वर्षं वाट पाहिली होती. त्यांनी ओडरवायर यांची लंडनमध्ये हत्या करून या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला होता. त्याच उधमसिंग यांचा आज स्मृतिदिन आहे. 31 जुलै 1940 रोजी त्यांना फासावर चढवण्यात आलं होतं.

काय झालं होतं जालियनवालामध्ये?

रौलट कायद्याचा शांतपणे निषेध करण्यासाठीच हा मोठा जनसमुदाय जालियनवाला बागेत जमलेला होता. अचानक आकाशातून लोकांना घरघर ऐकू आली. अनेकांनी यापूर्वी आयुष्यात कधीही विमान पाहिलेलं नव्हतं आणि हे विमान तर फारच खालून उडत होतं.

काहींना काहीतरी वेगळं घडत असल्याचा संशय आला आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

अचानक मागून बुटांचा आवाज आला आणि जालियनवाला बागेच्या बोळवजा रस्त्याने 50 सैनिक दाखल झाले.

25 गुरखा सैनिक आणि 25 बलूच सैनिक

सैनिकांची एक फळी बसली होती. दुसरी उभी होती. सैनिकांनी पोझिशन घेतली आणि एकही सेकंद न गमावता जनरल डायरने आदेश दिला, “फायर…”

कोणतीही पूर्वसूचना न देता गोळाबार सुरू झाला. चहूबाजूंनी बंदिस्त जालियनवाला बागेत अडकलेल्या लोकांवर पुढची दहा मिनिटं बुलेट्सचा वर्षाव होत होता.

सैनिक नेम धरून लोकांना टिपत होते.

बंदूक रिकामी झाली तर ती ‘री-लोड’ करण्याचे आणि गर्दी असेल तिथे गोळीबार करण्याचे जनरल डायरचे आदेश होते. लोक घाबरून सैरावैरा पळू लागली, पण बाहेर पडायचा एकच मार्ग होता. आणि तो ब्रिटिश सैन्याने रोखलेला होता.

अनेकांनी भिंत ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला, पण सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचा अचूक वेध घेतला. हळूहूळू मृतदेहांचा खच पडत होता.

गोळ्यांपासून जीव वाचवण्यासाठी अनेकांनी स्वतःला जमिनीवर झोकून दिलं, पण त्यांनाही सोडण्यात आलं नाही. सैनिकांच्या गोळ्यांनी लहान – मोठे, स्त्री – पुरुष सगळ्यांचाच वेध घेतला.

जनरल डायरच्या अगदी शेजारीच उभ्या असणाऱ्या सार्जंट अँडरसनने नंतर हंटर कमिटीला सांगितलं, “गोळीबार सुरू झाला तेव्हा सुरुवातीला सगळ्यांनीच जमिनीवर लोटांगण घातलं.”

“मग आम्ही काही लोकांना भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करताना पाहिलं. काही वेळाने मी कॅप्टन ब्रिग्सच्या चेहऱ्याकडे पाहिलं. बहुतेक त्यांना खूप वाईट वाटत होतं.”

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेकांनी जालियनवाला बागेत असणाऱ्या विहीर उड्या मारल्या.

अमेरिकेतल्या भारताच्या राजदूत राहिलेल्या नवतेज सारना यांनी जालियनवाला बाग घटनेच्या अभ्यास केला असून याविषयी पुस्तकही लिहिलं आहे.

ते म्हणतात, “एके ठिकाणी असा उल्लेख आहे की डायर यांचा सहकारी ब्रिग्सने एका क्षणी त्यांना कोपराशी धरून खूण केली – आता बास्स झालं.

पण जनरल डायरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तिथेच हजर असणाऱ्या एस. पी. रिहेल यांनी हंटर समितीसमोर साक्ष देताना म्हटलं होतं की लोकांची पळापळ झाल्याने हवेत धूळ उडाली होती आणि सगळीकडे रक्तच रक्त होतं.”

दहा मिनिटांच्या या गोळीबारादरम्यान डायरच्या सैनिकांनी गोळ्यांचे एकूण 1650 राऊंड्स झाडले.

13 एप्रिल 1919ला उधमसिंह यांचं वय होतं फक्त 4 वर्षांचं. पण तो दिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, “मी त्या दिवशी माझ्या आजोबांसोबत जालियनवाला बागेत गेलो होतो.

गोळीबार सुरू झाल्यावर आजोबांनी मला उचललं आणि सैनिकांपासून दूर, दुसऱ्या दिशेच्या भिंतीकडे पळायला लागले. बाहेर पडायला रस्ता नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मला सात फुटी भिंतीवरून दुसऱ्या बाजूला फेकलं.”

“उंचावरून खाली पडल्याने माझा हात मोडला, पण ही कहाणी सांगायला मी जिवंत राहिलो. त्रास होत असूनही अनेक दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. कारण आम्हाला भीती वाटत होती.”

गोळीबार थांबला आणि ज्या वेगाने सैनिक आले होते, त्याच वेगाने बाहेर निघून गेले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हंटर समितीसमोर जनरल डायरने नंतर सांगितलं होतं की लोकांच्या किंकाळ्या आणि आक्रोश इतका होता की गोळीबार थांबवण्यातही अडचणी आल्या. कारण डायर देत असलेल्या सूचना सैनिकांना ऐकूच जात नव्हत्या.

जालियनवाला बागेतून बाहेर पडून जनरल डायर आपल्या गाडीत बसून निघून गेला तर सैनिक मार्च करत गेले.

जालियनवाला बागेत विव्हळत पडलेल्यांना त्या रात्री कोणतीही मदत मिळाली नाही.

जनरल डायरने संध्याकाळी संपूर्ण अमृतसर शहराचा वीज आणि पाणी पुरवठा बंद केला. लोकांना घराबाहेर पडायला मनाई करण्यात आली.

म्हणून मग जखमी झालेल्या नातेवाईकांना बाहेर आणणं वा मृतांना घरी आणणंही लोकांना शक्य झालं नाही.

रात्री 10 वाजता जनरल डायरने पुन्हा एकदा शहरात फेरी मारत परिस्थितीचा आढावा घेतला. ब्रिटिश राजवटीने सुरुवातीला या नरसंहाराची दखल घेतली नाही. पण नंतर याविषयीच्या बातम्या पसरू लागल्या आणि त्यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ब्रिटिश सरकारने हंटर समितीची स्थापना केली. या समितीने डायरचं कृत्य चुकीचं ठरवलं. ब्रिटीश सरकारने जनरल डायरला राजीनामा द्यायला सांगितलं.

लंडनमधला ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यावर खडाजंगी झाली आणि डायरचं कृत्य चुकीचं असल्याचं तिथेही म्हटलं गेलं.

पण हाऊस ऑफ लॉर्ड्सने डायरच्या बाजूने भूमिका घेतली. ब्रिटीश सरकार डायरवर अन्याय करत असल्याचं इथे म्हटलं गेलं.

घटनेच्या रात्री जनरल डायरने तेव्हाचे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर ओ’डायर यांना पाठवलेल्या अहवालात 200 लोक मारले गेल्याचं म्हटलं होतं.

या गोळीबारात एकूण 379 लोक मारले गेल्याचं हंटर समितीने म्हटलं. यामध्ये 41 लहान मुलं होती.

पण इथे प्रत्यक्षात 1000 जण मारले गेल्याचं म्हटलं जातं. तर 4 ते 5 हजार जण जखमी जालेले होते.

अनेक जखमींचा घरी गेल्यावर काही काळाने मृत्यू झाला.

या घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी आपले सगळे पुरस्कार परत केले तर व्हॉईसरॉय चेम्सफर्ड यांना पत्र लिहीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनीही ‘नाईटहुड’ (Knighthood) परत करत असल्याचं कळवलं.

जनरल डायर विषयी

जनरल डायरचा जन्म भारतातच झाला होता. त्याचे वडील दारू निर्मितीचं काम करत.

डायरला ऊर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषा व्यवस्थित येत होत्या.

आपण लोकांवर गोळीबार करण्यासाठी मशीन गनचा वापर केला आणि बागेतून बाहेर पडण्याचा लहानसा रस्ता रोखला हे नंतर डायरने हंटर कमिशनसमोर मान्य केलं.

जिथे जास्त लोकं असतील तिथे गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचंही डायरने मान्य केलं. गोळीबार बंद झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्याची किंवा मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय न करण्यात आल्याचंही डायरने सांगितलं.

जनरल डायरकडे ‘ब्रिटिश साम्राज्याचा उद्धारक’ म्हणून पाहण्यात आलं. जनरल डायरचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाल्यानंतर शासकीय इतमामात त्याचं दफन करण्यात आलं.