जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शरद कार्ले तर उपसभापती पदी कैलास वराट यांची निवड

जामखेड: 

जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी भाजपचे शरद कार्ले व उपसभापती पदी आ. रोहीत पवार गटाचे कैलास वराट यांची निवड करण्यात आली असून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन्ही पॅनलला ९/९ असे समान मतदान झाल्याने चिठ्ठीवर निकाल हा निकाल जाहीर करण्यात आला. 

बाजार समितीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आ. राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्या दोन्ही पॅनलला एकुण १८ जागांपैकी समसमान अशा ९/९ जागा मिळाल्या होत्या. आज दि. १६ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत आ. राम शिंदे यांच्या पॅनलकडून सभापती पदासाठी शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी सचिन घुमरे तर आ. उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र निवडणूक प्रक्रियेव्दारे घेण्यात आलेल्या मतदानानुसार दोन्ही पॅनलला समसमान अशी ९/९ मते पडल्याने शेवटी निवडणूक प्राधिकृत अधिकारी यांनी ईश्वर चिट्टीच्या अधारे केलेल्या प्रक्रियेनुसार सभापतीपदी शरद कार्ले तर उपसभापती पदी कैलास वराट यांची निवड करण्यात आली.

   यावेळी सभापतीपदासाठी पुजा जाट तर उपसभापती पदासाठी रिध्दी जाट या दोन बहिणींनी चिट्ट्या काढल्या. दुपारी १:०० वाजता सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया ३:०० वाजेपर्यंत चालली व शेवटी ३:३० वाजता सभापती व उपसभापती यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या.

या निवडणूकीसाठी निवडणूक प्राधिकृत अधिकारी म्हणून विशेष जिल्हा लेखा परीक्षक आर. एस. निकम यांनी काम पाहिले. तर त्यांना सहकार्य म्हणून निलेश मुंडे, प्रकाश सैंदाने तसेच बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद यांनी काम पाहिले.