काकासाहेब तापकीर खुन प्रकरणी सर्व ११ आरोपींची निर्दोष मुक्तता

श्रीगोंदा : येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. एन. जी. शुक्ला यांनी खांडवी ता. कर्जत येथे दि. २४/०५/२०२० रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये खुन करण्यात आलेले काकासाहेब तापकीर व प्रकरणात गंभीर जखमी झालेले त्यांचे बंधू धनंजय तापकीर या खुनाच्या खटल्यातील सर्व ११ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, दि.२४/०५/२०२० रोजी यातील मयत काकासाहेब तापकीर जखमी धनंजय तापकीर हे दोघे त्यांच्या पत्नी व नातेवाईकांसोबत वास्तुशांतीचे कार्यक्रमास जात असतांना यातील आरोपी नामे टिंकू उर्फ प्रविण तापकीर, रोहित तापकीर, पोपट तापकीर, किरण तापकीर, मोहन तापकीर, राघू तापकीर, संकेत तापकीर, शुभम तापकीर, दिलीप तापकीर, प्रविण दिलीप तापकीर व संदिप तापकीर या सर्व आरोपींनी सकाळी ८.३० चे सुमारास रस्त्यात अडवून त्यांचेवर कोयता, तलवार, लोखंडी गज, लाकडी दांडके, लोखंडी पाईप, केबल इ. हत्याराने प्राणघात हल्ला केला व त्या हल्यामध्ये कामासाहेब तापकीर हे मयत झाले, तसेच धनंजय तापकीर यांचे हाताचे बोट कापून डोक्यावर गंभीर जखमा झाल्या, तसेच त्यांचेसोबत असलेल्या प्रतिक्षा तापकीर व पल्लवी तापकीर यांचेवर देखील झालेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या अशा स्वरुपाच्या तक्रारीवरुन कर्जत पोलीस स्टेशन येथे दि.२५/०५/२०२० रोजी वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये वरील सर्व आरोपींना अटक करण्यात येऊन निकाल लागेपावेतो अंदाजे तीन वर्ष सर्व आरोपी अटकेत होते. त्यांचा जामिन सर्वोच्च न्यायालयापर्यंत नामंजूर करण्यात आलेला होता. वरील प्रकरणाची सुनावणी सन २०२१ मध्ये सुरु झाली होती. त्यामध्ये आरोपीतर्फे अॅड. सतिश गुगळे, अॅड. एस. एस. शर्मा, अॅड.बी.एस. खराडे काम पहात होते.

प्रकरणात आरोपी तर्फे मयत काकासाहेब यांचा मृत्यू हा हल्ल्यामध्ये झालेला नसुन अपघाताने झालेला आहे व इतर साक्षीदारासही त्याच अपघातामध्ये जखमा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रकरणात असलेले एकूण ५ प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार हे बनावट व तयार केलेले साक्षीदार असून त्यांची साक्ष व पुरावा हा पुर्णपणे विसंगत, तसेच खोटा आहे. त्याच प्रमाणे वैद्यकीय पुरावा देखील खुनाच्या व हल्ल्याच्या घटनेशी सुसंगत नाही असा बचाव व युक्तीवाद सादर करण्यात आला. प्रकरणात एकूण २५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये प्रमुख घटना पहाणारे साक्षीदार यांचे उलटतपासणीमध्ये अनेक गंभीर बाबी न्यायालयासमोर उघड झाल्या व घटना ही अपघात असल्याबाबतचे अनेक दुवे व पुरावे न्यायालयाचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचप्रमाणे आरोपींकडून जप्त करण्यात आलेली वेगवेगळी हत्यारे व त्याचा जप्तीचा पुरावा हा किती कुचकामी व बनावट आहे या सर्व बाबीं न्यायालयासमोर सुनावणी दरम्यान व बचावात अॅड. सतिश गुगळे व त्यांचे वर नमुद सहकारी यांनी सादर केले. प्रकरणामध्ये तक्रार देण्यास कसा वेळकाढूपणा करण्यात आला व विचारापुर्वक कशी घटनेची कहाणी रचन्यात आली याबाबत सविस्तर घटनाक्रम व त्याचा तर्कशुध्द पुरावा आरोपींचेवतीने अॅड. सतिश गुगळे, अॅड. शर्मा, अॅड. खराडे यांनी युक्तीवादा दरम्यान न्यायालयासमोर सादर केला. तसेच वैद्यकीय पुरावा हा देखील कशा पध्दतीने ढवळा ढवळ करुन बनावट पध्दतीने घाईघाईत सादर करण्यात आलेला आहे व शवविच्छेदन करणारे वैद्यकीय आधिकारी तसेच जखमी यांच्यावर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर यांचा पुरावा हा संशयास्पद आहे याची सविस्तर मांडणी आरोपींच्यावतीने यशस्वीरित्या अॅड. सतिश गुगळे, अँड शर्मा व अॅड. खराडे यांनी मे. न्यायालयासमोर केली. त्यानुसार न्यायालयाने घडलेली घटना ही हल्ला आहे व काकासाहेब तापकीर याचा मृत्यू हल्ल्यामध्ये झाला याबाबत प्रचंड संशय आहे, तसेच घटनेवेळी हजर असलेले जखमी झालेले प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार हे वास्तविक पहाता घटनास्थळी हजर होते किंवा नाही याबाबत दाट संशय निर्माण होत आहे असे मत नोंदवून वैद्यकीय पुरावा देखील खुनाचे घटनेस पुरक नाही असे मत नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.